झी 24 तास, अहमदनगर : राज्यातले शेतकरी संपावर (Maharashtra Farmers Strike) 1 जून पासून जाणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शेतकरी विविध मागण्यां संदर्भात हे आंदोलन करणार असल्याचं समजतंय. हे धरणं आंदोलन पुणतांबा इथे करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शेतकऱ्यांनी संपाची हाक दिल्यानं सरकारसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
Maharashtra Farmers Strike |
आपल्या विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. पुणतांबा इथं शेतकरी 1 जून पासून धरणं आंदोलन सुरू करणार आहेत. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात 23 मे रोजी पुणतांब्यात ग्रामसभा झाली होती. या ग्रामसभेचा ठराव सरकारला पाठवून 6 दिवस उलटले तरी सरकारने काहीच प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे शेतकरी आता आक्रमक झालेले आहेत. त्यांनी धरणं आंदोलनाचा निर्धार केला आहे.
काय आहेत शेतकऱ्यांच्या मागणी??
ऊसाला एकरी 2 लाखांचं अनुदान द्यावं. दुधाला FRP प्रमाणे दर निश्चित करावेत. सोलर विजेची शेतकरी अनुदान प्रक्रिया सोपी करावी. गव्हाच्या निर्यातीवरची बंदी हटवावी, अशा प्रमुख मागण्या शेतकऱ्यांच्या आहेत.
यासह इतर 14 मागण्यांचे ठराव ग्रामसभेत घेण्यात आले आहेत. मात्र सरकारनं या मागण्यांबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
खरिप हंगाम तोंडावर आला आहे. अशात बळीराजा संपावर गेला तर ते राज्याला परवडण्यासारखं नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सरकार काय तोडगा काढणार याकडेच सर्वांचं लक्ष लागलं आहे.