मुंबई : सर्वत्र दिवाळीची जोरदार तयारी सुरु आहे. घराघरात फराळ केला जात आहे. बाजारपेठा देखील सजल्या आहेत. मात्र राज्य सरकारने केलेली घोषणा ही घोषणाच राहिली आहे. राज्य सरकारने गोर-गरिबांना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर 100 रुपयात रेशन कीट देणार अशी घोषणा केली होती. मात्र दिवाळी अवघ्या काही तासांवर आली असताना देखील गोरगरिबांना आनंदाची शिधा अजून मिळालेली नाही. त्यामुळे सर्वसामान्य रेशन कार्डधारकांमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झाल आहे.
राज्य शासनाकडून घोषित करण्यात आलेला आनंदाचा शिधा ही नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम आणि आदिवासी पाड्यांवर दिवाळीनंतर पोहचणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आनंदाचा शिधा नावाचं किट वाटप करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र पॅकेजिंगमुळे आनंदाची शिधा वाटपाला उशीर झाला आहे. यामुळे हे कीट मिळण्यासाठी आणखी आठवडाभर ऊशीर लागणार आहे.
या किटमध्ये एक किलो साखर, एक किलो रवा, एक किलो चणाडाळ, तर एक किलो पामतेल या गोष्टींचा समावेश आहे. साहित्य येण्यासाठी आणि त्याच्या पॅकिंगसाठी कमीत कमी आठवडाभराचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे गोरगरिबांची दिवाळी ही रेशन कीटविनाच जाणार आहे.
दरम्यान गरिबांची दिवाळी गोड करण्याची केवळ घोषणाच आहे, अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी टीका केली होती. तर मनसेनं देखील हे किट अजून रेशन दुकानांमध्ये पोहचलंच नसल्याचा आरोप केला होता. तसंच टेंडरमध्ये घोळ असल्याचा आरोप मनेस नेते संदीप देशपांडेंनी केला. विरोधकांच्या या टीकेनंतरही रेशन कीटला वेळ लागल्यामुळे सर्वसामान्य नाराज आहेत.
Pingback: Crop Loan Waiver List : 50 हजार रुपये अनुदान, दुसरी यादी जाहीर - Indien Farmer