जमिनीच्या वादातून आधी तलवारीने वार, नंतर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा केला प्रयत्न, नगरमधील घटना

 अहमदनगर : जमिनीच्या वादातून अहमगदनगर (ahmednagar) येेथे धक्कादायक घटना समोर आली आहे. नगर शहराच्या उपनगरामध्ये जमिनीच्या वादातून एकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या प्रकरणात बशीर पठाण हे गंभीर भाजलेले असून त्यांच्यावर अहमदनगर येथील शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणात भिंगार पोलीस ठाण्यामध्ये तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.


अहमदनगर-औरंगाबाद रोडवरील अमीर मळा येथे जागेच्या वादावरून झालेल्या वादात एकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला


            पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अहमदनगर-औरंगाबाद या रोडवरील अमीर मळा येथे जागेच्या वादावरून झालेल्या वादात एकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. बशीर पठाण असं या व्यक्तीचे नाव आहे. जखमी झालेल्या बशीर पठाण यांच्यावर अहमदनगर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 


            नातेवाईकांमध्ये जमिनीच्या वादातून ही घटना घडली आहे. जमिनीच्या वादावरून पठाण आणि नातेवाईक यांच्या मध्ये वाद झाला. यातून नातेवाईकांनीच पठाण यांच्यावर तलवारीने हल्ला केला होता. बशीर पठाण यांच्या मांडीवर तलवारीने वार देखील करण्यात आला आहे. त्यानंतर अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या घटनेमध्ये बशीर पठाण हे 80 टक्के भाजलेले आहेत. 


         बशीर पठाण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या जमिनीचा वाद सुरू असून या वादातून ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत भिंगार पोलीस स्टेशनमध्ये तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. जागेच्या वादावरून थेट जिवंत जाळण्याचा प्रकार घडल्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!