250 जॅक बसवून अख्खा बंगलाच वर उचलला; औरंगाबादमधील हाउस लिफ्टिंग ठरतेय वरदान

 औरंगाबाद : अल्लाउद्दीनचा चिराग घासल्यावर त्यातून जीन बाहेर पडतो आणि म्हणतो, ‘जिन हुं तुझे मै नही छोडूंगा’ असे म्हणत त्याने अख्खे घरच दोन हातांत उचलून घेतले. ही कल्पनिक कथा लहानपणी सर्वांनी वाचली असेलच. मात्र, बीड बायपास रोडवरील सत्कर्म नगरातील २ हजार स्क्वेअर फुटांचा ‘सावली’ हा बंगला तब्बल अडीच फूट वरती उचलण्यात आला आहे. ही काही परिकथेतील जिनची कमाल नसून नवीन तंत्रज्ञानाचा आविष्कार आहे. या कामासाठी बिहारमधील १८ मजुरांनी प्रचंड मेहनत घेऊन २५० जॅक लावून अवघ्या ८ तासांत जमिनीपासूनबंगला अडीच फूट वरती उचलला. ‘सावली’ नावाचा हा बंगला पायथ्यापासून (बेसमेंट) ४ फूट उंच उचलण्यात येणार आहे. 


250 जॅक बसवून अख्खा बंगलाच उचलला वर


          2 हजार स्क्वेअर फूट मध्ये संजय गडाप आणि आनंद कुुलकर्णी यांचा बंगला आहे. हा बंगला उतारावर आहे. पावसाचे व ड्रेनेजसाठी केलेल्या सेफ्टी टँकचे सर्व पाणी घरात येत असल्याने दोन्ही कुटुंबीय त्रस्त झाले होते. बंगला पाडून पुन्हा बांधण्यासाठी मोठा खर्च येत असल्याने अखेर हाउस लिफ्टिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. यासाठी हरियाणातील कंपनीशी करार केला होता. बंगला उचलण्याचे काम सुरू झाले, मंगळवारी यास ३० दिवस पूर्ण झाले. अडीच फूट बंगला वरती उचलला असून, आता बुधवारी आणखी दीड फूट उंच उचलण्यात येणार आहे. बंगल्याची उंची एकूण ४ फुटांनी वाढणार आहे. संपूर्ण काम आणखी १० दिवसांत पूर्ण होणार आहे. यासाठी बिहारमधील १८ मजूर काम करीत आहेत. 


बंगला वर कसा उचलतात 

         सर्वप्रथम बंगल्यातील फ्लोरिंग उखडण्यात येते. बंगल्याचा पाया २ फूट खोल खोदण्यात येतो. त्यातील संपूर्ण माती बाहेर काढून टाकण्यात येते. त्यानंतर फाऊंडेशनचा सिमेंटचा भाग कापण्यात येतो आणि मोकळ्या जागेत जॅक बसविण्यात येतात. त्या जॅकद्वारे हळूहळू सारख्याच अंतराने बंगल्याच्या संपूर्ण भिंती वर उचलण्यात येतात. एकसमान अंतराने जॅक उचलण्यात येत असल्याने कोणतेही नुकसान होत नाही. त्यानंतर लोखंडी प्लेट बसविण्यात येते. त्यात प्रत्येक जॅकमधील मोकळ्या भागात भिंत बांधण्यात येते त्यानंतर एकेक जॅक काढून टाकण्यात येतो व बंगल्याचा संपूर्ण भार नवीन बांधलेल्या फाऊंडेशनवर येतो.  

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!