डाळिंब उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. केंद्रीय पथकाने नुकसानीचे सर्वेक्षण देखील केले आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी अहवाल सकारात्मक पाठवावा, अशा सुचना खासदार डॉ. विकास महात्मे यांनी दिल्या आहे.
Pomegranate Farmers : आता सध्या आपल्या राज्यातील डाळिंब उत्पादक शेतकरी हा फार मोठ्या अडचणीत सापडला आहे. कारण, डाळिंबावर पिन बोरर आणि होल बोरर या खोड किडीचा मोठा प्रादुर्भाव झालेला आहे. या संकटातून बाहेर येण्यासाठी शेतकऱ्यांना चांगले तांत्रिक मार्गदर्शन करावे. तसेच केंद्रीय पथकाने केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याच्या दृष्टीने सकारात्मक पाठवावा, अशी सुचना खासदार डॉ. विकास महात्मे यांनी डाळिंब संशोधन केंद्रात झालेल्या बैठकीत केली आहे.
राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्रा मध्ये खोड किडीमुळे डाळिंब हे फळपीक अतिशय संकटात आल्या कारणाने त्याबाबत संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांबरोबर बैठक झाली होती. या बैठकीत डॉ. महात्मे हे बोलत होते. यावेळी केंद्राचे संचालक डॉ. राजीव मराठे आणि मोर्फाचे अध्यक्ष कृषि भूषण अंकुश पडवळे आणि शास्त्रज्ञ डॉ. ज्योत्सना शर्मा व मल्लीकार्जुन, डॉ. निलेश गायकवाड, मोर्फा चे संचालक हरिभाऊ यादव आदी सर्व उपस्थित होते. डाळिंबावर आलेल्या खोड किडी मुुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे केंद्राकडून शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई मिळण्यासाठी शास्त्रज्ञांनी तसा रिपोर्ट देऊन मदत करावी अशी अपेक्षा मोर्फाचे अध्यक्ष कृषिभूषण अंकुश पडवळे यांनी व्यक्त केली आहे.
या दरम्यान, मागील महिन्यात डॉ. विकास महात्मे व कृषिभूषण अंकुश पडवळे यांनी केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांची भेट घेऊन राज्यातील डाळिंब उत्पादकावर आलेल्या संकटाबाबत सविस्तर चर्चा केलेली होती. त्यानंतर कृषीमंत्री तोमर यांनी तत्काळ केंद्रीय पथकाद्वारे पाहणी करुन रिपोर्ट सादर करण्याच्या सुचनाही केल्या होत्या. केंद्रीय पथकाने सोलापूर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली असून लवकरच सदर रिपोर्ट केंद्राकडे सादर करणार आहे. त्या पार्श्वभूमीवर विकास महात्मे यांनी राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांसोबत सविस्तर चर्चा करण्यासाठी आले होते.
अनेक दुष्काळी भागातील शेतकऱ्यांचे हुकमी फळपिक म्हणजेच डाळिंब हे आहे. परंतू खोड किडीच्या संकटामुळे डाळिंब उत्पादक शेतकरी हवालदिल झालेला आहे. त्यांना आधाराची गरज आहे. केंद्रीय पथकाचा रिपोर्ट केंद्राला सादर केल्यानंतर परत केंद्रीय कृषीमंत्र्यांबरोबर बैठक घेऊन शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे डॉ. महात्मे यांनी बैठकीत सांगितले.