कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर दुहेरी संकट; एकीकडे मालाला भाव नाही, तर दुसरीकडे ऊन आणि अवकाळी पावसाच्या अंदाजामुळे बळीराजा चिंतेत…!

           सध्या कांदा काढणीला आलेला आहे. अनेक शेतकऱ्यांनी तर कांदा काढला असून वाढत्या तापमानामुळं कांदा खराब होण्याचं प्रमाण देखील वाढलं आहे. अनेक शेतकऱ्यांचा कांदा शेतातच पडून आहे. बाजारात कांद्याला फक्त 400 ते 500 रुपये क्विंटल एवढंच भाव मिळत आहे. तर दुसरीकडे हवामान खात्यानं देखील येत्या काही दिवसांत वादळी पावसाची शक्यता असल्याचं भाकीत केलेलं आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांसमोर कांदा साठवणुकीचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे, अशा परिस्थितीत मात्र कांदा उत्पादक शेतकरी हा दुहेरी संकटातच सापडला आहे.               सर्वच क्षेत्रात महागाईनं डोकं वर काढलेलं असताना देखील  शेतकऱ्यांच्या नशिबी कायमच शेतमालाला भाव कमी मिळणं हे ठरलेलंच असत. सध्या कांदा उत्पादक शेतकरी देखील अशाच काही अस्मानी आणि सुलतानी संकटात सापडलेला आहे. सध्या कांदा काढणीचे दिवस चालू आहेत.  यावर्षी पावसाळा चांगला झाल्यामुळे शेतीला मुबलक पाणी मिळालं आणि शेतकऱ्यांनी कांदा घेण्याचं ठरवलं होतं. ज्यावेळी कांदा लागवड केली, त्यावेळी कांद्याचे भाव प्रति क्विंटल 3 हजार रुपयांच्या घरात होते. चांगलं स्वप्न पाहून यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी कांदा लागवड केली होती. मात्र कांदा काढणीला आला की, भाव कमी होतच असतात. सध्या कांदा व्यापारी कांदा घ्यायलाच तयार नाहीत, तर जे घेणारे आहेत ते पडलेल्या भावात म्हणजेच, 400 ते 500 रुपये क्विंटलनं मागणी करत आहेत.            तरी यावर्षी विक्रमी कांदा लागवड झाली. अर्थात सध्या कांदा काढणीला आलेला आहे. तर अनेक शेतकऱ्यांचा कांदा काढून शेतात तयार केला आहे. पण भाव नसल्यामुळे आणि शेतकऱ्यांना कांदा साठवणूक करण्यासाठी व्यवस्था नसल्यामुळे शेतकऱ्यांचा कांदा 40 अंशांवर तापमान असल्या कारणानं उघड्यावर ठेवलेला कांदा मोठ्या प्रमाणात काळा पडून खराब होत आहे. तर येत्या 2 दिवसांत राज्यात काही भागांत अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हा दुहेरी संकटात सापडला आहे.         एकीकडे यावर्षी शेतीसाठी मुबलक पाणी असल्यामुळे शेतकऱ्यांनी रेकोर्डब्रेक कांदा लागवड केलेली. पण कांद्याचे भाव गडगडल्यामुळे आणि कांदा साठवणुकीची साधनं नसल्यामुळे मिळेल त्या भावात शेतकऱ्यांना कांदा व्यापाऱ्याला द्यावा लागत आहे. तर दुसरीकडे अवकाळी पावसाच्या शक्यतेमुळे शेतकऱ्यांच्या विवंचनेत अजूनच भर पडली आहे. जणू काही संकटे ही विदर्भातील शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पुजली असल्याचं चित्र सध्या बघायला मिळत आहे. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!